एअरफोर्स बेस -
पुण्यामध्ये सैनिकी प्रभाग म्हणजे मिलिटरी एरिया प्रचंड मोठा आहे. पुण्याच्या चारही दिशांनी आहे. आयुष्य पेठेत गेल्यामुळे याच्याशी कधीच संपर्क आला नव्हता. इतकच काय तर असा काही भाग आहे हे सुद्धा माहित नव्हतं.
पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून आजतागायत शेकडो वेळेला मी फ्लाइट्स पकडून जगभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमासाठी गेलो आहे. दोन-तीन वर्षापूर्वी मला तिथल्या एअरफोर्सच्या मुख्य कमांडंट कडून कार्यक्रमासाठी बोलावणं आलं. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही सकाळी लवकर या आम्ही तुम्हाला एयरफोर्स बेस दाखवतो. मग आम्ही अर्थातच गेलो.
एअरफोर्स बेस हा विमानतळा पेक्षा खूपच मोठा आहे. आपल्याला जो दिसतो, तो विमानतळ हा त्याचा एक छोटासा भाग आहे. सकाळी त्यांनी आम्हाला आधी खास एअरफॉर्स स्टाइल् चा ब्रेकफास्ट दिला, आणि आम्हाला त्यांच्या गाड्यांमधून बेस मध्ये घेऊन गेले. आधी आमचं रजिस्ट्रेशन केलं आणि आमचे फोन ताब्यात घेतले, कारण आत मध्ये कोणालाही फोन न्यायला परवानगी नाही. तिथले अधिकारी आतमध्ये अश्मयुगातला नोकिया 3310 इत्यादी वापरतात कारण त्याला कॅमेरा नसतो. ( खरं कारण म्हणजे कदाचित वरून विमानातून पडला तरी तो फुटत नाही हे असावं !!)
पुण्यातला एयरफोर्स बेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतात अनेक ठिकाणी एअर फोर्स चे असे बेस आहेत आणि त्यांचं आपापसात कम्यूनिकेशन कायमच असतं. आपली रडार सुद्धा सर्वोच्च श्रेणीची आहेत. त्यामुळे पाकिस्तान मधून विमानं निघाली, तर त्याच्या पुढच्या काही सेकंदात ते भारताच्या सर्व एअरफोर्स आणि इतर सैनिकी जागांना समजलेलं असतं. त्या विमानांना हवेतच अडवण्यासाठी, पुणे आणि इतर अनेक ठिकाणच्या विमानतळावरून सैन्याची विमानं आकाशात झेप घेतात. काही महिन्यांपूर्वीच आपण त्याचं प्रात्यक्षिक बघितलं.
भारताकडे जगातील काही अत्याधुनिक विमानं आहेत. सुखोई हे रशियन बनावटीचे अत्याधुनिक विमान भारतात तयार पण होते. सुखोई हे आवाजाच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने म्हणजे सुमारे ताशी अडीच हजार किलोमीटर वेगाने जाऊ शकते. म्हणजे पुण्याहून विमान उडाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासात ते पाकिस्तान हद्दी पर्यंत पोचू शकते. अर्थात, अर्धा तास खूप जास्त वाटतो पण भारतीय एअर फोर्स चे विमानतळ हे सीमेलगत पण आहेत त्यामुळे ते साधारण दोन मिनिटात तिथे पोहोचू शकतात.
आधी ते आम्हाला एअर ट्राफिक कंट्रोल दाखवायला घेऊन गेले. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे एका उंच टावर मध्ये सगळ्यात वरती काही अधिकारी बसलेले असतात, आणि कुठल्या विमानाने लँड व्हायचं किंवा कुठल्या विमानाने टेक ऑफ करायचा या सर्व सूचनांचा अधिकार त्यांच्याकडे असतो. पुण्याच्या अवतीभवती दहा का बारा विमानतळ आहेत. त्या सर्वांचा अधिकार या लोकांकडे असतो. त्यांना त्यांच्या रेंज मधली सर्व विमानं कुठे आहेत, त्यांची गती किती आहे, ती किती उंचीवर आहेत, आणि ती कुठे चालली आहे याची इत्थंभूत माहिती असते.
ह्यानंतर ते आम्हाला युद्धाची विमानं दाखवायला घेऊन गेले. युद्धाची विमानं ही तशी छोटी असतात. प्रथम काही छोटी विमाने दाखवून मग आम्हाला खास असं सुखोई विमान दाखवायला घेऊन गेले. सुखोई मात्र खूपच मोठं विमान आहे. त्या विमानामधून अत्याधुनिक क्षेपणास्त्र सोडायची पण क्षमता आहे. ही विमानं रोज दैनंदिन सरावासाठी भारतभर हिंडत असतात. अर्थातच प्रत्येक विमानतळावरची विमानांची रोजची संख्या वेगळी असते. त्यामुळे भारतात नक्की किती सुखोई विमानं आहेत हे सर्वोच्च अधिकारी सोडले तर कुणालाही माहीत नाही असं म्हणतात.
ही विमाने चालवण्यासाठी विशेष ट्रेनिंग लागतं. आधी हे ट्रेनिंग कॉम्प्युटरवर देतात. आम्हा सगळ्यांना त्यांनी त्या ट्रेनिंग च्या जागेवर नेले आणि ते विमान simulation मध्ये उडवून दाखवले. नंतर आम्हाला विचारलं की तुमच्यापैकी कोणाला सिमुलेशन करायच आहे का? सुभाष देशपांडे आमच्याबरोबर कीबोर्ड वाजवतो, तो म्हणाला मला करायचंय. त्याला खुर्चीत बसवून त्यांनी बेसिक माहिती त्याला दिली आणि उडव म्हणून सांगितलं. त्याने तर चक्क पैकी छान उडवलं तर खरं, पण खाली येताना लँडिंग च्या वेळेला तो विमनासाकट पडला. पण पुढच्या प्रयत्नात त्याने ते बरोबर लँड करून दाखवलं !!
एअरफोर्सच्या माणसांना याच्याविषयी खूपच आश्चर्य आणि अप्रूप वाटलं, आणि संध्याकाळी कार्यक्रमामध्ये मी जेव्हा जमलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की सुभाषने सुखोईचं लँडिंग केलं, तर लोकांनी उभे राहून टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की सुखोई लँडिंग करणं हे प्रचंड अवघड काम आहे आणि त्यासाठी खूप शिकावं लागतं.
आम्ही सुखोई समोर
खरं म्हणजे आम्हाला त्यांनी बरेच काही दाखवलं, परंतु मी ते इथे लिहू शकत नाही, कारण त्यांनी आम्हाला मुद्दामहून सांगितलं की कुठल्याही सोशल मीडियावर फोटो टाकायचे नाहीत. परंतु दरवर्षी एअरफॉर्स स्टेशनचा एक समारंभ असतो; त्या समारंभात कोणालाही प्रवेश असतो. तिथे आपण जाऊन बघू शकाल.
AFMC -
AFMC आणि NDA शी आमचं नातं मात्र इतकं गंभीर, म्हणजे सीरियस नव्हतं. शेवटी ती दोन्ही कॉलेजे आहेत ना!!
पुण्याच्या दक्षिण-पूर्व दिशेला एएफएमसी आहे. हे त्यांचं वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेज. एएफएमसी चा आणि आमचा संपर्क तसा पूर्वीचाच. कॉलेजमध्ये असल्यापासूनच आमचा एएफएमसी आणि एनडीए इथल्या कॅडेटची ओळख आणि संपर्क थोडाफार होता.
काही शनिवारी इथली मुलं आमच्या कॉलेजला यायची, परंतु त्यांच्याबरोबर डॉक्टर होऊ घातलेल्या मुली पण असायच्या. त्या सर्व मुली अतिशय हुशार होत्या, त्यामुळे त्यांना एनडीए अथवा एएफएमसी मधल्या मुलांमध्ये काहीही रस नसून, सर्व उत्तम, उत्कृष्ट, अद्वितीय मुलं ही फर्ग्युसन कॉलेजमध्येच आहेत, हे पटलेलं होतं. आता दुर्दैवाने त्यातल्या कुठल्याच मुलीनी आमच्याकडे फारसं बघितलं नाही, कारण आम्हाला मुलींकडे लक्ष देण्यापेक्षा टवाळक्या करण्यात जास्त रस होता हा भाग वेगळा. पण तेवढ्यात आमच्या एका मित्राने त्यातल्या एका मुलीला पटवण्याचा जोरदार प्रयत्न केल्यामुळे, त्याच्याबरोबर अनेक वेळेला सायकलवर एएफएमसी पर्यंत उगाचच चकरा नंतरच्या काळात झाल्या. परंतु अर्थातच त्याचा त्याला आणि मला कोणालाच, काहीच उपयोग झाला नाही. 20, 25 किलोमीटर सायकल चालवायचा फालतू व्यायाम मात्र व्हायचा.
NDA -
सगळ्यात पहिल्यांदा मिलिटरीची तोंड ओळख झाली ती फर्गसन कॉलेजमध्ये.
कॉलेजला आमच्या आसपास खूपशा अत्यंत सौंदर्यवान ललना, म्हणजे मुली, म्हणजे पोरी असायच्या. त्यांच्यावरती इम्प्रेशन मारायचा आणि त्यांना पटवायचा आम्ही जमेल तेवढा प्रयत्न करायचो. परंतु लवकरच आम्हाला असं लक्षात आलं की, निळा गणवेश घातलेली आणि न्हाव्याशी भांडण झालेले असावे, अशी दिसणारी बरीचशी मुलं मधेच केव्हा तरी एखाद्या शनिवारी-रविवारी आसपास दिसायला लागतात आणि या दुष्ट स्त्रियांपैकी बऱ्याच तरूणी ह्या त्यांच्याबरोबर हिंडताना दिसतात. तेव्हा कळलं की हे नमुने NDA मधले आहेत.
अर्थातच एनडीए विषयी मनःपूर्वक तिरस्कार निर्माण होण्यासाठी एवढं कारण पुरेसं होतं. त्यांची एक बस असायची आणि ते सगळे संध्याकाळी पाच का सहा पर्यंत इकडेतिकडे भटकायचे आणि बसमध्ये बसून निघून जायचे. दिसायला एकदम खप्पड असायचे; आमच्या तुलनेत तर एकदमच फडतूस असायचे. त्यांची हेअर स्टाईल गवत कापायच्या यंत्राने केलेली असावी अशीच असायची, आणि इतकंच काय वैशालीतलं सगळ्यात चांगलं टेबल कुठलं आहे, हे पण त्या येड्याना माहिती नसायचं. आम्ही इतके जबरदस्त फॅशनेबल कपडे घालून सायकल वरून इकडे तिकडे फिरायचो आणि हे त्यांचा रटाळ गणवेश घालून चालत चालत जायचे. एकुणातच काय, फारच बावळट बंडू असायचे. पण ह्या मुली आमच्या.... त्यांच्याबरोबर भटकायच्या. आमच्याकडे बघायच्या पण नाहीत. आता आमच्या आसपास राहून थोडी तरी अक्कल यायला पाहिजे ना!! पण नाही
असो. पुढे अनेक वर्षांनंतर एक दिवस मला एक फोन आला 'क्या मेरी बात मिलिंद दातेजी से हो रही है क्या?" असं अस्खलित हिंदीत मला कुणीतरी विचारलं आणि मी जमेल तशा हिंदीत उत्तर दिलं. तो फोन एनडीए मधून आला होता, आणि ते मला कार्यक्रमासाठी बोलवत होते. मधल्या काळात माझं लग्न झालं होतं आणि कर्मधर्मसंयोगाने माझे सासरेबुवा हे ब्रिगेडिअर होते. म्हणून मी एनडीएतल्या लोकांना सांगितलं की माझे सासरे ब्रिग. आर. एल. राव हे एनडीए चे पास आऊट आहेत. मला असं वाटतं की त्यांना त्यांचं कॉलेज, म्हणजे एनडीए बघायला आवडेल. त्यांना पण घेऊन आलो तर चालेल का? ती मंडळी खूश झाली. आणि कार्यक्रमाच्या दिवशी माझ्या सासरेबुवा आणि सासुबाईं साठी त्यांनी खास गाडी पाठवली.
माझ्या सासरेबुवांसाठी त्यांनी खास 'हाय टी', म्हणजे विशेष चहापानाची सोय केली होती. तिथले दोन तीन उच्च अधिकारी आणि त्यांच्या पत्नी त्यांना भेटायला आले होते. माझ्या सासूबाई त्या स्त्रीयांबरोबर गप्पा मारू लागल्या आणि ते अधिकारी आणि माझे सासरेबुवा ह्यांची बराच वेळ, 'सैन्य आणि त्यात झालेले बदल' इत्यादी विषयांवर चर्चा चालू होती. नंतर त्यांना बरच एनडीए त्यांनी फिरून दाखवल. 'गाड्याबरोबर नळ्याची यात्रा' असं म्हणून मलाही त्यांच्याबरोबर एनडीए आतून बघायला मिळालं. निवृत्त सैन्याधिकारीं विषयी त्यांना किती आदर असतो याची थोडीशी चुणूक मला बघायला मिळाली.
एनडीए तसं खूप मोठं आहे. म्हणजे सुमारे 7000 एकर. ( आत 32 फुटबॉल ग्राउंड आहेत म्हणे !! ) तिथे त्यांचा स्वतःचा.एक विमानतळ पण आहे. विद्यार्थ्यांची हॉस्टेल्स, अधिकाऱ्यांचे निवास, ह्याव्यतिरिक्त कॉलेजमध्ये असतात तशा अनेक प्रयोग शाळा आणि वर्ग पण आहेत. एनडीएची मुख्य इमारत सुदान ब्लॉक ही एक विशेष इमारत आहे. मुख्य इमारतीचा आकार हा आर्मीच्या तोफेसारखा आहे तर बाजूची नेव्हीची बिल्डिंग ही बोटीच्या अँकर (लंगर) सारखी आहे, आणि एअर फोर्स ची त्याच्या बाजूस बाजूची बिल्डिंग ही विमाना सारखी आहे.
अनेक ठिकाणी रणगाडे, तोफा वगैरे युद्धात जुन्या झालेल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आम्ही जात असताना माझे सासरे बुवा त्या सर्व आयुधांविषयी आम्हाला माहिती देत होते. माझ्या सासरेबुवांचे याविषयीचे ज्ञान बघून जो कॅडेट आमच्या बरोबर होता तो खूपच इम्प्रेस झाल्यासारखा वाटला. माझे सासू सासरे त्या दिवशी खूपच खूष होते.
एनडीएच्या कॅम्पस वरती प्रचंड झाडी आहे आणि त्यामुळे हरणं, मोर, ससे, आणि इतर अनेक प्राणी तिथे राहतात. आम्ही इकडून तिकडे जात असताना एकदा तर आमच्या समोरून दोन मोर उडत उडत गेले. जो अधिकारी आम्हाला दाखवत होता त्याने सांगितले की इथे खरं तर खूप हरणं आणि मोर आहेत. परंतु आता मोकाट कुत्री मारायला परवानगी नसल्यामुळे, इथली अनेक कुत्री टोळी करून हरीण आणि इतर प्राण्यांना मारतात. आम्ही काहीच करू शकत नाही.
एनडीएमध्ये मी खूप कार्यक्रम वाजवले आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांची, म्हणजे कॅडेट्स ची टाळ्या वाजवण्याची एक विशेष पद्धत आहे. एक-दोन-तीन, एक-दोन-तीन, एक---दोन---तीन-- अशा मीटरमध्येच ते टाळ्या वाजवतात. एक रचना संपली की प्रचंड जोरात पण अत्यंत शिस्तबद्ध अशा टाळ्या ऐकू येतात. पहिल्या वेळेला तर मी दचकूनच गेलो. मग हसू यायला लागलं. पण हसायची सोय नाही!! समोर सगळ्यांकडे बंदुकांच लायसन्स. !!! मग हळूहळू सवय झाली. तरीपण एका कार्यक्रमात तर मी इतका फ्रस्ट्रेट झालो की, शेवटी मी स्टेजवरून त्यांचे सगळ्यात प्रमुख कमांडंट असतात त्यांना विनंती केली की, यांना कमीत कमी एकदा तरी नॉर्मल टाळ्या वाजवायला परवानगी द्या !! जशी त्या कमांडंटने परवानगी दिली, तशी माझ्या पुढच्या रचना नंतर इतक्या कडाडून टाळ्या वाजल्या की आजसुद्धा त्या सुद्धा माझ्या कानात आहेत.
आजतागायत मी खूप खूप कार्यक्रम सैन्यासाठी वाजवले आहेत. त्यात मी माझी स्वतःची बिदागी कधीच घेत नाही. जेंव्हा जेंव्हा माझा सैन्याशी संपर्क आलेला आहे, तेव्हा तेव्हा माझ्या मनात फक्त 'सर्वोच्च आदर' ही एकच भावना येते.
आमच्या NDA च्या कार्यक्रमानंतर
सांगण्यासारख खूप काही आहे पण लेख आधीच खूप लांबला आहे. म्हणून एका खास कार्यक्रमाविषयी ची गोष्ट सांगून लेख संपवतो.
एकदा आमचा कार्यक्रम चार वाजता होता आणि थिएटरमध्ये बरेचसे कॅडेट्स गणवेशात बसलेले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटांमध्ये माझ्या लक्षात असं आलं की त्यातले बरेचसे कॅडेट्स हे झोपून जायच्या मार्गावर आहेत. मग मी माझ्या तबला वाजवणाऱ्या मित्राकडे बघितलं, आणि त्याला खूण करून आम्ही स्टेजवरून खूप जोर जोरात आवाज केले. जे कोण थोडेफार झोपायला लागले होते त्या प्रण्यांची झोपमोड झाली, आणि ते पुन्हा आमच्या कडे लक्ष देऊ लागले. परत थोड्यावेळाने असंच झालं. मग संपूर्ण कार्यक्रम भर आणि हेच करत होतो !! कुणीतरी झोपताना दिसलं की जोरात काहीतरी वाजवायचो, की त्यांची झोपमोड व्हायची आणि पुढील दहा-पंधरा मिनिटात ते आमच्याकडे लक्ष द्यायचे. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा त्यांचे अधिकारी मला भेटायला आले तेव्हा मला अतिशय नर्व्हस वाटत होतं. सामान्यता माझ्या कार्यक्रमात लोकं झोपत नाहीत. मी झोपेन एक वेळ, पण प्रेक्षक कधी झोपल्याचे मी बघितलं नाही. (आजतागायत मी तीन कार्यक्रम निम्म्या झोपेत वाजवले आहेत. आणि ते कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाले असे पण नंतर लोकांकडून ऐकले आहे) पण आजची गोष्ट जरा विशेष होती.
परंतु आश्चर्याची गोष्ट अशी, की अधिकारी अत्यंत खूश होते!! ते मला म्हणाले की इतका सुंदर कार्यक्रम आम्ही कधीच ऐकला नाही. या सर्व कॅडेट्स जागं ठेवणारा कलाकार आणि कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच बघितला !! नंतर त्यांनी मला हळूच सांगितलं की हे कॅडेट सगळे सकाळी साडे पाच वाजल्यापासून, 40 किलो वजन घेऊन, कुठलातरी एक्सरसाइज करून दिवसभर पर्वत चढून आले होते. त्यामुळे त्यांना जागं ठेवणं, हे एक अशक्य काम तुम्ही करून दाखवलेलं आहे!!!
- मिलिंद दाते
Comments